रत्नागिरी:-कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेत दरवर्षी यथोचित सन्मान करून गौरव केला जातो.
यंदा शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
कांबळी गेली तीस वर्षे शब्दकोडी साकारत आहेत. त्यांच्या शब्दकोड्यांची दखल लिम्का बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. तसेच त्यांच्या२५० × २५० म्हणजे ६२ हजार ५०० चौकोनांच्या दुसऱ्या कोड्याचीही नोंद इंडिया बुकमध्ये झाली. याबद्दल कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कांबळी यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. हा सन्मान येत्या १७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक संकुल येथे होणार आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, कोषाध्यक्ष प्रकाश दळवी, कार्यवाह माधव अंकलगे आणि केंद्रीय कार्यकारिणी सदस्यांनी श्री. कांबळी यांचे अभिनंदन केले आहे.