लांजा : विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूविक्री प्रकरणी लांजा पोलिसांनी धाड टाकून ३१ हजार ५०० रुपयांच्या गावठी हातभट्टीच्या दारूसाठ्यासह एकाला ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार सकाळी ७.१० वाजता भांबेड पवारवाडी येथे करण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, तालुक्यातील भांबेड येथे एक जण बेकायदा गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लांजा पोलिसांनी शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.१० वाजता भांबेड पवारवाडी येथील मांजरांबा येथील काजूच्या बागेत व लवेश रघुनाथ पवार यांच्या घराजवळील मोकळ्या पडवीत धाड टाकली असता यावेळी त्या ठिकाणी प्लॅस्टिकचे १५ कॅन यामध्ये प्रत्येकी २० लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. तीची किंमत ३१ हजार ५०० रुपये इतकी असून हा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला आहे.
विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारू विक्री प्रकरणी लांजा पोलिसांनी लवेश रघुनाथ पवार (वय ४७, भांबेड पवारवाडी) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे हे तपास करत आहेत.