तिन्ही तालुक्यातील शाळा होणार हायटेक
रत्नागिरी : केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळा गुणवत्ता आणि भौतिक सुविधेत ही सर्वोत्कृष्ट होण्यासाठी केंद्र सरकारने उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पीएम श्री योजनेतून हायटेक शाळा बनवण्यासाठी रत्नागिरी जिह्यातील आणखी तीन शाळांची निवड झाली आहे. यापूर्वी निवड झालेल्या 13 शाळांची सर्वांगीण विकासाची कामे सुरू आहेत.
‘पीएम श्री’ योजनेतून जिल्ह्यातील 13 शाळा हायटेक करण्यात येणार होत्या. मात्र, आणखी 3 शाळा वाढवण्यात आल्या असून, आता त्या एकूण शाळांची संख्या 16 झाली आहे. पीएम श्री योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या शाळांमध्ये दापोली जिल्हा परिषद शाळा हर्णे नं. 1, चिपळूण जिल्हा परिषद शाळा खेर्डी नं. 1, लांजा जिल्हा परिषद शाळा लांजा नं. 1 यांचा समावेश आहे. या शाळांसाठी 24 कोटी 44 लाख रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून देण्यात येणार आहे.
जिह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी व भविष्यात पाठदुखीचा त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांनी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी हितगूज साधायला सुरवात केली आहे. त्यासाठी मध्यंतरी प्रत्येक खातेप्रमुखाला शाळेवर पाठवण्यात आले होते. तसेच पाठÎपुस्तक व दफ्तरातील साहित्याच्या पलीकडे जाऊन त्यांना शाळेत, शाळेच्या परिसरातील उपलब्ध साधनसामुग्रीतूनही विविध विषयांचे ज्ञान अवगत करता यावे यासाठी दप्तराचे ओझे कमी करण्यावर भर दिला जात आहे.