मुंबई:-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते भाजपच्या संकल्प पत्राचे प्रकाशन करण्यात आले. या संकल्पपत्रात लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० ऐवजी २१०० रुपये देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार.
शिवाय महिला, विद्यार्थी, वृद्ध त्यासोबतच यात रोजगार, व्यवसाय यांसह विविध मुद्द्यांवरही देण्यात येणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पियुष गोयल, विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांसह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.
भाजपच्या संकल्प पत्रातील महत्त्वाच्या घोषणा
लाडकी बहीण योजनेतील महिलांना १५०० वरुन २१०० रुपये दिले जाणार, गड-किल्ल्यांसाठी प्राधिकरण, महाराष्ट्रात कौशल्य जनगणना, सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत व्हिजन महाराष्ट्र @२०२९ सादर केले जाणार, महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण, महिलांच्या सुरक्षेसाठी २५००० महिलांचा पोलीस दलात समावेश, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १२ हजार वरुन १५ हजार, प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्यात येणार, वृद्ध पेन्शन धारकांना १५०० वरुन २१०० रुपये दिले जाणार, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार, २५ लाख रोजगार निर्मिती, महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन, ग्रामीण भागात ४५ हजार गावात पांधण रस्ते बांधणार, ५० लाख लखपती दीदी तयार करण्याचा प्रयत्न, फिनटेक आणि एआयमध्ये सर्वात जास्त रोजगार निर्मिती होणार आणि त्यांचे केंद्र महाराष्ट्र असेल, महारथीमार्फत मोठ्या लॅब तयार करणार, युवात फिटनेस असला पाहिजे त्यासाठी स्वामी विवेकानंद फिटनेस कार्ड, अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधन वाढ करुन त्यांना दर महिना १५ हजार वेतन आणि विमा संरक्षण देणार, वीज बिलात ३० टक्के कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार आदी घोषणांचा समावेश आहे.
आमचं संकल्प पत्र, विरोधकांचं स्थगिती पत्र – फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांच्या प्रेरणेने भारतात आम्ही काम करत आहोत, असे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पांना महाराष्ट्रात अस्तित्वात आणण्यासाठी या संकल्पपत्रातून होत आहे. संकल्प पत्र कागदाचा डॉक्युमेंट नाही. पूर्ण ताकदीने काम करण्यासाठीचं पवित्र डॉक्युमेंट आहे. आज १२ वाजता एक स्थगिती पत्र येणार आहे. या राज्यात ज्यांना केवळ चालणाऱ्या प्रकल्पांना स्थगिती देण्यास रस आहे, अशा लोकांचं पत्र १२ वाजता येणार आहे. पण जनतेचा विश्वास महायुतीवर आहे, भाजपवर आहे.
आमच्या संकल्प पत्रात अनेक गोष्टी आहेत. ज्या २५ गोष्टी आम्ही हायलाईट केल्या आहेत. त्यातील १० मुद्दे जो आम्ही महायुतीचा दहा कलमी कार्यक्रम घोषित केला. आम्ही लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये देणार आहोत. आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. आम्ही भावांतर योजना आणणार आहोत. जिथे हमी भावाने खरेदी होणार नाही, तिथे भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना फायदा देऊ. हे मागच्यावर्षी करून दाखवलं, असंही फडणवीस म्हणालेत.