चिपळूण:- येथील मध्यवर्ती बस स्थानकात जूनमध्ये झालेल्या सोने चोरी प्रकरणी पोलिसांनी बीड येथील एका महिलेला अटक केली.
चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकात गेल्या ७ जून रोजी सायंकाळी चिपळूण-खेड गाडीत चढताना एका सुवर्णकार दांपत्याचे साधारणतः पाऊण किलो वजनाचे सोने चोरीला गेले होते.
गाडीत चढताना असलेल्या गर्दीचा फायदा घेत वैशाली काळे (रा. गेवराई, बीड) या महिलेने आपल्या अन्य महिला साथीदारांच्या सहाय्याने ही चोरी केली होती.
एका गुप्त बातमीदाराने याबाबत माहिती दिल्यानुसार पोलीस या चोरट्यांच्या शोधात होते. परंतु आरोपी सापडत नव्हते. अखेर सांगली जिल्ह्यात एक आरोपी आढळल्याचे समजताच पोलिसांनी खातरजमा करून त्या महिलेला अटक करून चिपळूण पोलीस ठाण्यात आणले. तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपींची कसून तपासणी सुरू असून अद्याप तिने गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. या प्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गादर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. शिंदे करीत आहेत.