चौघेजण जखमी, वाहनांचे मोठे नुकसान
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ येथे तीन कार व एक पिकअप याच्यात अपघात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. यात पिकअप पलटी आली असून चौघेजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, यात तीन कारसह पिकअपचे मोठे नुकसान झाले आहे.
कापसाळ येथे एका मार्गिकाच्या डिव्हाडरमधून एक वाहन दुसऱ्या मार्गिकीकडे जात होते. असे असताना ते वाहन जातेवेळी त्या मागे एक कार येऊन थांबली. त्या थांबवलेल्या कारच्या मागे असलेल्या दुसऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने त्या कारला मागून धडक दिली. असे असतानाच त्या कारच्या पाठोपाठ असलेल्या भरधाव वेगातील पिकअपवरील चालकानेही त्या कारला मागून जोरदार धडक दिली. इतकेच नव्हे तर या पिकअपच्या मागे असलेल्या भरधाव वेगातील एका कारने त्या पिकअपला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की या धडकेनंतर पिकअप त्याक्षणी महामार्गावर पलटी झाली. ती कार महामार्गाला लावण्यात आलेल्या लोखंडी ग्रीलवर जाऊन जोरात आदळली. यात लोखंडी ग्रील देखील तुटला आहे. ही सर्व वाहने रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जात होती. या पिकअप मध्ये एका लहान मुलाचा समावेश होता. त्यास दुखापत झाली असून त्यावरील चालक व अन्य एक महिला मात्र जखमी झाली आहे. तसेच एका कार मधील अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. त्या सर्वांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चिपळूण पोलिस दाखल झाले. केनच्या सहाय्याने पलटी झालेला पिकअप सुस्थितीत करण्यात आला.