खेड : खेड- दापोली मार्गावरील दास्तुरीनजीक पोलिसांनी विदेशी मद्याची वाहतूक प्रकरणात सव्वा दोन लाखाचा एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 20 हजार रुपये किंमतीची विदेशी दारू व रिक्षा असा 2 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज येथील पोलिसांनी रविवारी सायंकाळच्या सुमारास जप्त केला. याप्रकरणी सुनील गोविंद कासारे (45 भोलवली-मंडणगड), भांबू शिवराम कासारे(56 दाभट -बौद्धवाडी मंडणगड) यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ते एम एच. 08/बी.सी. 1048 क्रमांकाच्या रिक्षातून विदेशी मद्यसाठ्याची वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच येथील पोलिसांनी सापळा रचला. हे दोघेजण रिक्षातून विदेशी मद्यसाठा घेऊन खेड येथून मंडणगडच्या दिशेने जात होते. येथील पोलिसांनी दस्तुरी फाट्याजवळील दीप्ती हॉटेल नजीक रिक्षाची झडती घेतली असता विदेशी मद्यसाठा आढळला. सायंकाळी उशिरा दोघांवरही बेकायदेशीररित्या विदेशी मद्यसाठ्याची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबतचा अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.