सामाजिक कार्यकर्त्या, माजी सभापती संजना माने यांनी केली वीज कर्मचाऱ्याना स्वतःच्या घरात भाऊबीज
रत्नागिरी : कोकणात परतीच्या पावसाचा फटका काही दिवसांपूर्वी रत्नागिरी तालुक्यातील चाफे, मालगुंड, वरवडे, खंडाळा, जयगड भागाला मोठ्या प्रमाणात बसला. विजेचे अनेक खांब उन्मळून पडले. परिणामी चाफे, गणपतीपुळे, मालगुंड, खंडाळा, जयगड भागात सर्वच ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. ऐन दिवाळीच्या सणात हा पावसाचा हा खेळ झाल्याने सर्वच वरील परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले.
लोकांसमोर वीजपुरवठा सुरळीत कसा होईल हा प्रश्न असताना खंडाळा विभागातील वीज कर्मचाऱ्यानी मात्र स्वतःच्या घरातील दिवाळीच्या सणाकडे लक्ष न देता, या अनेक गावातील प्रत्येक घरात दिवाळी कशी साजरी होईल यासाठी प्रयत्न केले. पहिल्या दिवशी अगदी जोरात काम सुरू असतानाच पुन्हा एकदा पावसाने तडाखा देऊन काम थांबविले. तरीही हताश न होता वीज कर्मचा-यांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सकाळी काम करत सर्व विजेचे खांब उभारले आणि तीन दिवसानंतर वीजपुरवठा सुरळीत केला.
आपल्या घरी आपले कुटुंबीय आपली वाट बघत असतानाही वीज कर्मचा-यांनी दर्शविलेल्या तत्परतेचे सर्वच कौतुक करावे या हेतूने दिवाळी, भाऊबीज आणि सर्व दिवाळी सण कामात गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कासारी गावच्या सामाजिक कार्यकर्त्या , माजी सभापती सौ संजना उदय माने यांनी कर्मचारी आणि त्यांच्या सर्व टीमप्रती आत्मीयता म्हणून सर्वच वीज कर्मचाऱ्यांची भाऊबीज केली.
तब्बल ७२ तास काम केल्यानंतर आलेला थकवा संजना माने यांच्या पुढाकाराने झालेल्या भाऊबीजेने दूर झाला अशी बोलकी प्रतिक्रिया सर्वच कर्मचाऱ्यानी दिली. तीन दिवस घरापासून दूर राहत कर्मचाऱ्यानी केलेल्या कामाप्रति आदर म्हणून सामाजिक कार्यकर्त्या माजी सभापती सौ संजना माने यांनी सर्वच कर्मचारी यांच्यासाठी दाखविलेल्या आपुलकीचे कौतुक होत आहे.
संजना माने ह्या नेहमीच समाजाच्या गरजा ओळखून काम करताना आपल्या कार्यक्षेत्रातील कुणीही त्याच्या समाधानापासून दूर राहणार नाही, यासाठी सदैव पुढाकार घेत असतात. समाजातील प्रत्येक गरजूपर्यंत पोहचून त्यांना अपुलकीची भावना निर्माण करत असतात. त्याचाच एक भाग दिवाळीसारख्या मोठ्या आणि पवित्र दिवसात कुटुंबियापासून दूर असणाऱ्या सर्वच वीज कर्मचारी यांना आपल्या घराची आठवण करून देणारी भाऊबीज करत सन्मान केल्यामुळे सर्वच कर्मचारी अगदी भावनाविवश झाले होते. सामाजिक कार्यकर्त्या, माजी सभापती सौ संजना माने यांनी दाखविलेल्या तत्परतेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.