मुंबई:-माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कार्यकाळात संविधानाप्रमाणे न्याय मिळायला हवा होता, अशी अपेक्षा होती, मात्र ते घडलेच नाही, असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.
तसेच केवळ जनताच याचा निकाल लावेल असा विश्वास व्यक्त केला.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परतूर येथील प्रचारसभेत भाजप आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडत न्याय न मिळाल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश निवृत्त झाले तरी आम्हाला अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आता जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्याची वेळ आली आहे. सर्वात महत्त्वाचं न्यायालय म्हणजे जनतेचं न्यायालय आहे आणि हेच न्यायालय आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही,असे त्यांनी ठामपणे विश्वास व्यक्त केला.
ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरीला गेल्याचा आरोप केला आणि त्यांच्या खऱ्या शिवसेनेला, ‘नकली सेना’ म्हणणाऱ्यांवर त्यांनी जोरदार टीका केली. पक्षाची प्रतिष्ठा, चिन्ह आणि फोटो वापरणाऱ्या व्यक्तींना त्यांनी कठोर शब्दांत उत्तर दिलं.
ते पुढे म्हणाले की, जर कोणी माझ्या शिवसेनेला नकली सेना म्हणत असेल तर ते बेअकली आहेत. आमच्या पक्षाच्या नावाती चोरी केली आहे, असं म्हणत त्यांनी भाजप व शिंदे गटावर निशाणा साधला.
न्यायालयीन प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त करत,ते रोखठोकपणे म्हणाले की, लोकशाही अखेरची घटका मोजत आहे. तिला वाचवणारं कुणी आहे का?असा सवाल करत त्यांनी जनतेला साद घातली.