सावंतवाडी:-दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी येथे दुर्मिळ असा सोनेरी साप सापडला आहे. या सापाला पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटले. अशा प्रकारचा साप अद्याप पर्यंत कुणीही पाहिलेला नाही. मात्र गेल्यावर्षी याच परिसरात असाच साप दिसला होता. हा साप सोनेरी रंगाचा असल्यामुळे त्याला उडता सोनसर्प असे म्हणतात.
घोटगेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या घरालगतच्या परसात शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आढळून आला होता. अशा प्रकारचा साप गेल्यावर्षीही जूनमध्ये दिसून आला होता असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. या सापाला शेलाटी तथा उडता सोनसर्प असे म्हणतात. इंग्रजीत ऑरनेट फ्लाईंग स्नेक म्हणतात. हा दक्षिण व आग्नेय आशियात आढळणारा साप आहे.
अशाप्रकारचे हिरवट पिवळे काळे पट्टे आणि सुंदर नक्षी असलेले साप महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर आणि आंबोली घाटात आढळून येतात. या सापाची लांबी ही सुमारे 2.5 ते 4 फूट असून तो निमविषारी प्रवर्गातील असल्याचे जाणकारांचे मत आहे.