मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून समर्थ रंगभूमीतर्फे सत्कार
रत्नागिरी:- नाटक कलेला वाहून घेतलेल्या ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्याच्या परंपरेनुसार समर्थ रंगभूमीने रंगभूमी दिन साजरा केला. मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून गेली 40 वर्षे, सुमारे सातशे नाटकातून विविध भूमिका साकारणाऱ्या प्रेमा मुरकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन, संस्था अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रेमाताईच्या जीवनावरील लेखाचे सुशील जाधव यांनी वाचन करून, त्यांनी यशस्वी केलेल्या काही नाटकांचा उल्लेख केला. त्यामध्ये रामची ताई, एखाद्याचं नशीब, साक्षात्कार, घडली मला अश्रू फुलांची, माती सांगे कुंभाराला, अमरदान, जन्मदाता, का व्यर्थ जन्मले जगी, संपली रात्र तिमीराची, रणांगार, अशा गाजलेल्या नाटकांचा समावेश होता.
यावेळी त्यांचे नातेवाईक, नाटय क्षेत्रातील चाहते तसेच शांतीनगर मधील मान्यवर उपस्थित होते. अशी ताई प्रत्येकाच्या जीवनात असायला हवी म्हणजे जीवन सुखकर होईल असे मिलिंद सावंत यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले. ऍड. साई शिवलकर यांनी नाटय क्षेत्रात अशी ताई पुन्हा होणे नाही असे कौतुकोद्गार काढले.
जयवंत बुवा बोरकर, प्रमिल मुणगेकर आणि रवी पेटकर यांनी नांदी सादर केली. ओघवते निवेदन सुशील जाधव यांनी केले, तर प्रकाश मुणगेकर यांनी सर्वांचे आभार मानले. ऍड. सरोज भाटकर, मनीषा महाजन, शीला चव्हाण, हे देखील उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद सावंत, श्रीकांत पाटील, सुहास साळवी, जयदेव शिंदे, प्रदीप मोरे, सुशील जाधव, प्रमिल मुणगेकर, प्रकाश मुणगेकर, वृषाली सावंत, नागेश कुरटे, गौरी मुणगेकर, कृष्णा महाजन, आणि संतोष बोरकर यांनी मेहनत घेतली.