तुषार पाचलकर / राजापूर:-तालुक्यातील बारसू, सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध असल्याने रिफायनरीऐवजी पर्यावरणपूरक व जनतेला मान्य असलेले तसेच मोठी गुंतवणूक असलेले दोन प्रकल्प राजापुरात आणण्याची ग्वाही महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याने त्यात राजापूर- लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघातील आपल्यासारख्या एका आमदाराचा समावेश असावा, यासाठी येथील स्थानिक जनतेनेच ही निवडणूक हाती घेऊन आपले मनोबल वाढविल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात सतत भावनेचे राजकारण झाल्याने अनेक पिढयाचे नुकसान झाले आहे. येथील ओस पडत चाललेली गावे-बाजारपेठांच्या प्रश्नासह स्थानिक जनतेच्या शिक्षण व्यवस्था, आरोग्यसेवा आणि रस्ते पाण्यासह सर्वच पायाभूत सुविधांची असलेली दुरवस्था पाहून महायुती शासनाने शेकडो कोटींचा निधी दिला आहे. दुर्दैव म्हणजे स्थानिक आमदारांनी एकाच मतदारसंघात किंबहुना आपल्याच मतदारसंघात अधिक निधी दिला म्हणूनही भावनिक तक्रार आहे. त्यामुळे त्यांची निष्ठा मतदारसंघाशी आहे की फक्त राजकीय आहे, असा सवाल किरण सामंत यांनी उपस्थित केला आहे.