चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शनिवारी सकाळी ट्रकला अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र अरुंद रस्ता असल्यामुळे अपघातानंतर जवळपास तासभर वाहतूक ठप्प झाली होती.
शनिवारी सकाळी 8 वाजता हा ट्रक गुजरातहून गोव्याच्या दिशेने पावडर घेऊन जात होता. परशुराम घाटात एकेरी वाहतूक सुरू आहे. असे असताना तेथील अरुंद रस्त्यावरुन हा ट्रक जात असताना ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले व लगत असलेल्या एका गर्डरला जाऊन हा ट्रक आदळला. त्यामुळे ट्रकच्या बंपरचा भाग चाकाच्या दिशेने दबल्याने चाक जाम झाले. हा ट्रक तेथेचा उभा राहिला. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना मार्गच नसल्याने अखेर परशुराम घाटात सकाळीच मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या घटनेची माहिती चिपळूण पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वाहतूक कोंडी सोडवण्याच्यादृष्टीने इतर मार्गिका सुरु करुन वाहतुकीसाठीचा मार्ग मोकळा करण्यात आला.