चिपळूण : मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स चोरटयाने लांबवल्याची घटना 6 ते 7 नोव्हेंबरदरम्यान घडली. या प्रकरणी शुक्रवारी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती महिला व तीची जाऊ अशा दोघी 7 नोव्हेंबरला कुडाळ रेल्वेस्थानक ते चिपळूण रेल्वेस्थानक असा मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करत होत्या. प्रवासात त्यांची पर्स चोरटयाने लंपास केली. पर्समध्ये 25 व 39 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल, रोख 6,300 रूपये, 22 हजार रुपये किंमतीची दोन घडयाळे असा 92 हजार 300 रुपयांचा ऐवज होता. हा प्रकार त्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरटयावर गुन्हा दाखल करण्यात आला.