राजापूर : राजापूर वनविभागात वनपाल पदावर कार्यरत असलेले जयराम बावधने हे शासकीय कर्मचारी असतानाही निवडणूक प्रचार करत असल्याचे आढळून आल्याने त्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये आ. साळवी यांनी राजापूर विधानसभा मतदार संघातील प्रतिस्पर्धी उमेदवार किरण सामंत हे सरकारी यंत्रणेचा वापर करीत असल्याचे समजले असून राजापूर वनविभागात वनपाल पदावर कार्यरत असलेले बावधने हे अप्रत्यक्षपणे सामंत यांचा प्रचार करत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे एका शासकीय कर्मचाऱ्याने आचार संहितेचा भंग केला असून बावधने यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी राजन साळवी यांनी या तक्रार अर्जाद्वारे केली आहे.