चिपळूण:-दुचाकीवरून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या तरुणाला चिपळूण पोलिसांनी अटक केल्याची घटना गुरुवार 8 नोव्हेंबर रोजी शहरातील पेठमाप येथे घडली. त्याच्याकडून 7 हजार 40 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून शुक्रवारी एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कादीर तय्यब मेमन (41, पेठमाप) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कादीर मेमन हा दुचाकीने गुटख्याची वाहतूक करत असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला शहरातील पेठमाप येथे पकडले असता एका कापडी पिशवीत 7 हजार 40 रुपये किंमतीचा गुटखा सापडला. त्यामध्ये 6336 रुपयांच्या केसरयुक्त विमल पान मसाल्याचे 32 पॅकेट, 704 रुपयाचा व्ही-1 तंबाखू 32 पॅकेट याचा समावेश होता, तसेच 50 हजार किंमतीची दुचाकी असा एकूण 57 हजार 40 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मेमन याला अटक करण्यात आली असून शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मेमन याने हा गुटखा कोठून आणला, हे पोलीस तपासातून पुढे येणार आहे.