लांजा:-विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूविक्री प्रकरणी लांजा पोलिसांनी धाड टाकून 31 हजार 500 रुपयांच्या गावठी हातभट्टीच्या दारूसाठयासह एकाला ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार सकाळी 7.10 वाजता भांबेड पवारवाडी येथे करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भांबेड येथे एकजण बेकायदा गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लांजा पोलिसांनी शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.10 वाजता भांबेड पवारवाडी येथील मांजरांबा येथील काजूच्या बागेत व लवेश रघुनाथ पवार यांच्या घराजवळील मोकळ्या पडवीत धाड टाकली असता त्या ठिकाणी प्लास्टिकचे 15 कॅन यामध्ये प्रत्येकी 20 लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळली. तिची किंमत 31 हजार 500 रुपये इतकी असून हा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला.
विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूविक्रीप्रकरणी लांजा पोलिसांनी लवेश रघुनाथ पवार (47, भांबेड पवारवाडी) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश आखाडे करत आहेत.