रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजधानी स्थळ असलेल्या तीर्थक्षेत्र किल्ले रायगड ते महाड या रस्त्याचे रुंदीकरण व कॉंक्रिटीकरणाचे काम गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ संथ गतीने सुरू आहे . या कालावधीत ठेकेदार देखील बदलण्यात आले, रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आल्यामुळे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. . या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी किल्ले रायगड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.
महाड ते किल्ले रायगड रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात येत आहे. निकृष्ट काम आणि कामातील भ्रष्टाचारामुळे कोंझर गावा जवळ काँक्रीट रस्ता आणि मातीचा भराव यामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. यामुळे रस्ता खचुन अपघात होण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
मुंबई गोवा महामार्ग आणि महाड म्हाप्रळ पंढरपूर या रस्त्यांप्रमाणेच किल्ले रायगडाकडे जाणारा महाड रायगड राष्ट्रीयचे काम गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ अपूर्ण अवस्थेतच आहे. पूर्वी असलेल्या डांबरीकरण रस्त्या ऐवजी शासनाने काँक्रीट रस्त्याचे काम मंजूर केले. रस्त्याचे रुंदीकरण करत असताना यामध्ये असलेले भले मोठे वृक्ष देखील तोडण्यात आले. सुरुवातीला हे काम एल बी पाटील कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. मात्र या कंपनीकडून कामाला वेग दिला गेला नसल्याने शासनाने अक्षय कंट्रक्शन कंपनीला हे काम दिले. अक्षय कंट्रक्शन ने देखील पूर्वीच्या कंपनी प्रमाणेच काम सुरू केले आहे. दोन वर्षांपासून अक्षय कंट्रक्शन या रस्त्याचे काम करत आहे. जागोजागी झालेले खोदकाम आणि ठराविक टप्प्यांवर काँक्रीट करून सोडून दिलेले काम यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह , किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवप्रेमींना आणि पर्यटकांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम सुरू असताना वाहन चालकांना आणि प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी कंट्रक्शन कंपनीने घेतली पाहिजे, मात्र जागोजागी पडलेली खडी, खड्डे, माती यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.
शिव पुण्यतिथी , शिवराज्याभिषेक, शिवजयंती आणि इतर सोहळ्यांसाठी किल्ले रायगडावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल होतात . वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि लागणारा वेळ याकरता रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला, अक्षय कंट्रक्शन कंपनी कडून महाड रायगड रस्त्याचे काम दिल्यानंतर म्हाप्रळ पंढरपूर या रस्त्याचे काम देखील देण्यात आले आहे. यामुळे दोन्ही रस्ते अपूर्ण अवस्थेत आहेत. महाड रायगड मार्गावरील आणि म्हाप्रळ मार्गावरील गावातील नागरिकांची मागील दोन वर्षापासून फार मोठी गैरसोय झाली आहे. गडावर होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी अनेक मान्यवर आणि शिवप्रेमी दाखल होतात. अशावेळी शासनाकडून या रस्त्यांची कामे त्वरित करून घेण्यासाठी कंट्रक्शन कंपनीकडे तगादा लावला जात आहे. यामुळे दिवस-रात्र काम करून कंट्रक्शन कंपनी गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून काम करून घेत आहेत. याचा प्रत्यय कोंझर गावाजवळ आला आहे. यापूर्वी नातेखिंड ते लाडवली यादरम्यान रस्ता खचून गेल्याचे समोर आले होते. त्याचप्रमाणे ऐन पावसाळ्यात लाडवली पुलाचे काम अर्धवट राहिल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले होते. अशीच काहीशी परिस्थिती कोंझर गावाजवळ निर्माण झाली आहे. या ठिकाणी श्री शिवराज्याभिषेकापूर्वी घाई घाईने काँक्रिटीकरणाचे काम केले गेले होते. यामुळे या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे. झालेले काँक्रीट आणि त्या खालील मातीचा भराव यामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. माती खचली गेली असल्याचे स्पष्ट दिसत असून रस्त्याच्या दोन्ही बाजूचा भाग दिसून येत आहे. यावरून दिवस-रात्र वाहनांची ये जा सुरू आहे. वरून काँक्रीट रस्ता दिसत असला तरी खाली निर्माण झालेल्या पोकळी मुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रस्ता तुटून या ठिकाणी अपघात झाल्यास सदर कन्ट्रक्शन कंपनी जबाबदार असेल असे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.
महाड रायगड रस्त्यावर कोंझर घाटामध्ये अद्याप बरेच काम बाकी आहे. तर कोंझर आणि वाडा या दरम्यान असलेल्या पुलाच्या कामाला देखील सुरुवात झालेली नाही. या ठिकाणी असलेल्या तीव्र उतारावर रस्त्यावर मोठे खड्डे आणि खडी पसरली गेल्याने सातत्याने अपघात होत आहेत. दुचाकीस्वार या ठिकाणी घसरत आहेत. त्याचप्रमाणे काही अंतरांवर काँक्रिटीकरण करून सोडून देण्यात आले आहे. मधल्या भागामध्ये केलेले खोदकाम आणि कच्चा रस्ता यामुळे देखील अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक वेळा याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी आवाज उठवून देखील याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी देखील याबाबत नागरिकांच्या प्रश्नां वर गप्प असल्याचे दिसून येत आहे.