जाकादेवी /वार्ताहर:- रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे भाजपा, शिवसेना, रिपाइं (आठवले) महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारात रिपाइं (आठवले) पक्षाच्या वतीने पावस हरचेरी विभागात जोरदार प्रचार यंत्रणा राबवित असून जनतेचा भरघोस पाठिंबा मिळत असल्याची प्रतिक्रिया रत्नागिरी रिपाइं तालुका अध्यक्ष विलास कांबळे यांनी दिली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदास आठवले नुकतेच रत्नागिरी रिपाइं जिल्हा मेळाव्याला रत्नागिरीत आले असता रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात अत्यंत दैदिप्यमान अशी उल्लेखनीय कामगिरी केली असून शहरी व ग्रामीण भागामध्ये विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. याबाबत नामदार आठवले यांनी उदय सामंत यांच्या कार्याचे खास कौतुक केले. तरी सर्व आंबेडकरी बहुजन समाजाने व रिपब्लिकन पक्षाने विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे ,असे आवाहन केले. त्यानुसार रिपाइंने रत्नागिरी विधानसभा मतदार संघात ना.उदय सामंत यांच्या प्रचारात उत्तम नियोजन करून प्रचार मोहीम प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी विविध गावशाखांना भेटी देणे सुरू झाले आहे.
रत्नागिरी तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे धडाडीचे चेअरमन विलास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष दिपक कांबळे, सचिव – उज्वल उर्फ बंटी कांबळे, ज्येष्ठ नेते तु. गो. सावंत, विजय आयरे, कि. रा. पवार आदी पदाधिकारी उदय सामंत यांच्या प्रचारामध्ये सहभागी झाले आहेत. संपूर्ण मतदार संघात महायुतीचे उमेदवार ना.उदय सामंत यांचे पारडे जड असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. ना. उदय सामंत यांनी गावोगावी केलेली भरीव स्वरूपाची विकासकामे, सामाजिक व शैक्षणिक बाबतीत अनेकांना दिलेले योगदान व वैयक्तिक जनसंपर्क यांचा सकारात्मक परिणाम निवडणुकीत दिसेल असे चित्र प्रचाराच्या दरम्याने रत्नागिरी तालुका विधानसभा मतदारसंघात दिसून येईल,असे मतदार बोलताना दिसत आहेत.