संगमेश्वर:-तालुक्यातील कळंबुशी बौद्धवाडी येथे फटाके वाजविण्यावरून हाणामारी झाल्याची घटना 4 नोव्हेंबर रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली मधुकर पवार आणि रमेश लक्ष्मण पवार हे शेजारी-शेजारी राहणारे आहेत. यांच्यामध्ये सामायिक जमीन जागेवरून वाद आहेत. घरातील लहान मुले घरासमोरील अंगणामध्ये फटाके वाजवत होती. फटाके हातामध्ये पेटवून ते हवेत उडवत असताना एक फटाका रमेश पवार यांच्या अंगणामध्ये पडला. या गोष्टीचा रमेश पवार याला राग येऊन त्याने सोनाली मधुकर पवार हिला शिवीगाळ केली तसेच अपशब्द वापरले. ती दरवाजात उभी असताना काठी घेऊन अंगावर मारण्यासाठी धावत गेले, यावेळी सोनालीने रमेश पवार याला ढकलून दिले. याचा राग येऊन कल्पना पवार हिने सोनाली पवार हिला शिवीगाळ केली व अंगावरील कपडे फाडून टाकले, अशी फिर्याद सोनाली मधुकर पवार हिने संगमेश्वर पोलीस ठाण्यात केली आहे. तिच्या फिर्यादीवरून रमेश लक्ष्मण पवार व कल्पना रमेश पवार यांच्याविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच रमेश लक्ष्मण पवार यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये असे म्हटले आहे की, घरासमोर दरवाजाच्या पायठणीवर फटाके पेटत होता. म्हणून रमेश पवार यांना संशय आला की, पुतण्या विनोद पवार यांच्यानमुलांनी हा फटाका लावला असावा म्हणून विनोद पवार याला फटाके कोणी फोडले, या बाबत विचारणा केली असता सोनाली पवार या हातात काठी घेऊन येत रमेश पवार यांना शिवीगाळ केली. तसेच मधुकर दामोदर पवार हे हातात काठी घेऊन रमेश पवार यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेले व शिवीगाळ बाचाबाची झाली. तसेच रमेश लक्ष्मण पवार व कल्पना रमेश पवार यांच्या डाव्या हातावर मारून दुखापत केली. या फिर्यादीवरून मधुकर पवार व सोनाली पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परस्परविरोधी तक्रारीवरून 4 जणांवर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास माखजन दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी करत आहेत.