गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी मानले पाठिंबा देणाऱ्यांचे आभार
देवरुख:-गाव विकास समितीच्या चिपळूण-संगमेश्वर विधानसभेच्या उमेदवार अनघा कांगणे यांना कुणबी युवा मुंबईने पाठिंबा दिल्याबद्दल गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी कुणबी युवाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
महायुतीचे उमेदवार व महाविकास आघाडीचे उमेदवार या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात ग्रामीण भागाच्या विकासासाठी गाव विकास समितीने चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिला आहे. रोजगारासाठी एमआयडीसी विकास, तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल, पायाभूत सुविधा शेती विकास, त्याचबरोबर गाव खेड्यातील शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे या चार गॅरंटी गाव विकास समितीने दिल्या आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी गाव विकास समिती लढत असताना या लढ्याला कुणबी युवा मुंबईने पाठिंबा दिल्याबद्दल गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी कुणबी युवाचे अध्यक्ष माधव कांबळे यांना फोन करून कुणबी युवाचे आभार मानले आहेत.
कुणबी युवा मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघात प्रत्यक्ष प्रचारात सहभागी व्हावे व त्यांच्या पातळीवर अनघा कांगणे यांना मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत असेही आवाहन उदय गोताड यांनी केले आहे. गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या संकल्पनेनुसार गाव विकास समिती झिरो बजेट इलेक्शन उपक्रमांतर्गत ही निवडणूक लढत असून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या लढ्यात कुणबी युवा व त्यांच्या सहकारी संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन ही गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी केले आहे.