दापोली देगाव येथील घटना
दापोली:-गुरे चरवण्यासाठी गेलेल्या दापोली देगाव येथील तरुणावर बुधवारी सकाळच्या सुमारास डुकराने हल्ला केल्याने जखमी झाल्याचा प्रकार घडला.
देगाव येथील अनिल पांडुरंग चीनकटे हा तरूण नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी 8 च्या सुमारास आपली जनावरे देगाव माळरानावर चरवण्यासाठी घेऊन गेला होता. जनावरे चरत असताना अचानक मागून येऊन डुकराने अनिलवर हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या दोन्ही हातांना व डाव्या पायाच्या मांडीला डुकराने जबर जखमी केले. चीनकटे हे जमिनीवर पडले व आरडाओरडा केला. सुदैवाने त्याचा मोठा भाऊ सुनील चीनकटे हा जवळच असल्याने त्याने धाव घेत डुकराला पळून लावले. तरुणाला उपचारासाठी ग्रामस्थांच्या सहाय्याने फणसू आरोग्य केंद्रात आणले. तिथे प्रथमोपचार करून अनिल चीनकटे यांना पुढील उपचारासाठी दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.