कुडाळ:-आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यात आणलेल्या प्रतिभा दूध डेअरी कडून जिल्ह्यातल्या ११२ दूध उत्पादक संस्थांना आणि वैयक्तिक दूध उत्पादक तसेच वाहतूकदार याना त्यांचे देणे असलेले २ कोटी ७८ लाख ७ हजार ५०० रुपये १८ नोव्हेंबरपूर्वी म्हणजेच निवडणुकीपूर्वी व्याजासहित द्यावेत, अशी मागणी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे.
निवडणुकीच्या काळात लोकांना पैसे वाटण्यापेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे राणेंनी द्यावेत, असेही सतीश सावंत यांनी सांगितले. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
सतीश सावंत पुढे म्हणाले, २०१७ पासून प्रतिभा दूध डेअरी जिल्हा दूध संघामार्फत जिल्ह्यामध्ये दूध कलेक्शन केले होते. प्रतिभा दूध डेअरी व आमदार नितेश राणे यांच्या कडून जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायिक व संबंधितांचे हे सुमारे २ कोटी ७८ लाख ७ हजार ५०० रुपये अजूनही मिळालेले नसून रखडलेले आहेत. यामध्ये आमदार नितेश राणे हे मध्यस्थ आहेत. त्यावेळी मी जिल्हा बँक अध्यक्ष होतो तसेच जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर होते त्यामुळे या विषयाची आम्हालाही माहिती आहे. आता जिल्हा दूध संघावरती प्रशासक आहे आणि ह्या पैशाची वारंवार मागणी जिल्हा दूध संघाने प्रतिभा डेअरीकडे व त्यांचे जे मध्यस्थ नितेश राणे यांच्याकडे केलेली होती. मात्र वारंवार यामध्ये आश्वासन दिली जात आहेत.
२०२१ मध्ये जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये हा विषय ज्यावेळी सभागृहात काढला गेला, त्यावेळी नारायण राणे यांचा राग अनावर झालेला होता. आणि त्या पैशाला मी जबाबदार आहे असे त्यांनी जिल्हा नियोजन बैठकीत सांगितलं होते. त्यानंतर या रखडलेल्या पैशासंदर्भात दि. १५ ऑगस्ट २०२२ ला जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आणि संबंधित दुग्ध संस्था हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपोषणाला बसले असता नारायण राणे यांनी त्यावेळी एम. के. गावडे आणि या सर्व संस्थांना या पैशाला मी जबाबदार आहे, या संदर्भात वाहतूकदार तसेच इतर संबंधित व्यक्तिनीं मला फोन केले आहेत असे राणे यांनी सांगितले होते.
त्या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये राणे यांचे दोन्हीही मुलगे उभे आहेत. त्यामुळे राणे यांनी मतदारांना पैसे वाटण्यापेक्षा या जिल्ह्यातील संस्था आहेत आणि जे सुमार ७५ ते ८० वैयक्तिक दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांचे २ कोटी ७८ लाख रुपये आहेत ते द्यावेत की जेणेकरून त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. नारायण राणे सांगतात की, आपण या जिल्ह्याचा खरा विकास केला, मी समृद्धी आणली, मी या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. असे सांगणाऱ्या नारायण राणे यांनी रखडलेल्या पैशामुळे जे दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर आले आहेत त्यांना सावरावे.
राणे यांनी लोकसभेत आर्थिक ताकदीवरती जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे फक्त निवडणुका जिंकण्यासाठी जनतेचा वापर करणारे कुटुंबियांचे प्रमुख म्हणून तुम्ही जे दुधाचे पैसे आम्ही देऊ असे आश्वासन दिले आहे ते राणे यांनी १८ नोव्हेंबरच्या अगोदर पुर्ण करावे, आणि नंतरच राणे यांनी जिल्ह्यात दोन्ही मुलांसाठी मत मागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. परंतु येथील जनता आणि दूध उत्पादक शेतकरी हे सुज्ञ आहेत ते त्यांच्या निर्णय घेतील.
या रखडलेल्या पैशांमध्ये जिल्ह्यातील प्रामुख्याने माणगाव दूध संघ सुमारे ५४ लाख ७२३ रुपये, मसुरे कामधेनू संस्था ६ लाख ८५ हजार आडेली सुमारे आठ लाख २५ हजार, सुकळवाड सुमारे ७ लाख ६८ हजार, वेतोरे १२ लाख ३६ हजार, जैतीर संस्था तुळस ४ लक्ष ७६ हजार, मडुरे १४ लाख ५९ हजार, तळगाव ६ लाख 4 हजार, कासरल ३ लाख ५७ हजार, दुसरी संस्था कसरलची ४ लाख ५६ हजार, तसेच इतर बऱ्याच संस्था आणि वैयक्तिक दूध उत्पादक शेकटारायण पैसे दिले गेले नसून यामध्ये दूध वाहतूकठेकेदार आठ जण आहेत. यामध्ये भाजपचेही काही कार्यकर्ते आहेत यांचे २० लाख २५ हजार रुपये रखडलेले आहेत,या से सतीश सावंत यांनी स्पष्ट केले.
आता राणे माझ्यावर वैयक्तिक टीका करतील, त्यांनी जरूर माझ्यावर वैयक्तिक टीका करावि पण या प्रतिभा डेअरीचे तुमच्या चिरंजीवाने जे पैसे द्यायचे आहेत ते अगोदर द्या, असे ही सावंत यांनी सांगितले.
गाईला राज्य माता म्हणून जो काही दर्जा महायुतीच्या मंत्रिमंडळाने दिलाय, तेवढा तरी भारतीय जनता पक्षाने आदर ठेवावा आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा या राणे कुटुंबीयांना अशा प्रकारच्या सूचना देऊन हे राहिलेले २ कोटी ७८ लाख ७ हजार ५०० रुपये दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात भाग पाडावे आणि त्यानंतरच गाईला राज्य माता म्हणून तिचा मान सन्मान त्यांनी करावा, असे ही सावंत शेवटी म्हणाले.