चिपळूण:-लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या रूपाने महाविकास आघाडीला मिळेल. त्यामुळे विजय आपलाच आहे, असा विश्वास माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
चिपळूण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे नेते श्री. राऊत चिपळूणमध्ये आले होते. चिपळूणमधील जिल्हा परिषद गटांच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. गाफील राहू नका, प्रत्येक गावात, वाडीत, घरात तुतारीचे चिन्ह पोहोचवा, एकजुटीने कामाला लागा, असे आवाहन श्री. राऊत यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना केले. ते म्हणाले, ही निवडणूक फार वेगळी आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. निष्ठा विरुद्ध गद्दारी अशी ही निवडणूक आहे. विचारांची ही निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत तुमचे आमचे अस्तित्व पणाला लागले आहे. कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार हे महत्त्वाचे नसून महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार निवडून देऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आणणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे एक एक जागा महत्त्वाची आहे. प्रशांत यादव यांच्यासारखा एक सज्जन, कर्तृत्वान तरुण उमेदवार म्हणून आपल्याला लाभला आहे. त्याला विजयी करणे ही तुमची जबाबदारी आहे.
आता गाफील राहू नका, फाजील आत्मविश्वास बाळगू नका, लोकसभा निवडणुकीत शेवटच्या घडीला गडबड झाली तशी होता कामा नये, सजग रहा, भक्कम एकजूट करा आणि कामाला लागला. या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून प्रशांत यादव यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन देखील राऊत यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
यावेळी श्री. राऊत यांनी चिपळूण शहरातील प्रचार फेरीत सहभाग घेतला. तसेच चिपळूण शहर आणि जिल्हा परिषदेच्या पेढे, सावर्डे, अलोरे, पोफळी गटात, नांदिवसे पंचायत समिती, कोंढे पंचायत समिती गणातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन थेट संवाद साधला आणि निवडणुकीबाबत कानमंत्र दिला.