राजापूर:-कोकणातील लोकांना जो प्रकल्प नको तो प्रकल्प कोकणात येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, असे सांगत शिवसेनेचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
पर्यावरणपूरक प्रकल्प कोकणात आणण्यासाठी आमचे प्रयत्न असतील आणि त्याची सुरुवात झाली आहे. लवकरच हजारो तरुणांना रोजगार मिळेल असा मोठा प्रकल्प येथे येईल, असेही सुतोवाच श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.
राजापूर येथे महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री उदय सामंत, महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा गेली सव्वादोन वर्षे पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. याआधी महाराष्ट्रात इतके निर्णय झाले नव्हते. महाराष्ट्रात अनेक मोठमोठे प्रकल्प आले. पण उद्योगधंदे बाहेर जात आहेत असा कांगावा विरोधकांकडून केला जातो. उदय सामंतही व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपल्या काळात १ लाख १७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्रात आले आहेत, असे खासदर शिंदे यांनी सांगितले.
त्यांच्या काळात अडीच वर्षांत उद्योगांबाबत काही सामंजस्य करार झाले; पण एकही प्रकल्प जागेवर झाला नाही. आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही आम्हाला दाखवा, जागेवर घेऊन जा आणि प्रकल्प दाखवा; पण काहीच काम झाले नव्हते, असा आरोप शिंदे यांनी केला. एखादे काम दिल्यानंतर ते काम पूर्ण कस होईल यासाठी पाठपुरावा हा नेहमी किरणभैयांचा असतो, अशी किरण सामंत यांच्यावर स्तुतीसुमने उधळतानाच २३ तारखेला तुम्ही आमदार म्हणून निवडून याल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
कोकणाने कायम शिवसेना-भाजपा युतीला साथ दिली आहे. लोकसभा निवडणुकीत कोकण महायुतीबरोबर राहिले. या विधानसभेतही येथील जनता महायुतीबरोबर राहील. जे हिंदुत्वाला विसरून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले त्यांच्याबरोबर येथील जनता उभी राहिली नाही, हे लोकसभा निवडणुकीत येथील कोकणातील जनतेने दाखवून दिले, असे शिंदे यांनी सांगितले. खुर्चीचा मोह असतो आणि हाच मोह काहीजणांना झोपू देत नाही आणि यामुळेच हा मोह अडीच वर्षांपूर्वी जे सत्तेत होते त्यांना झाला आणि ते खुर्चीवर जाऊन बसले. आधी महाराष्ट्रात १२७ जागा लढत होते आणि आघाडीतील ठाकरेंच्या जागा वाटपाचा आकडा पाहा. आता ते महाविकास आघाडीत ९० जागांवर येऊन बसले; पण ते बोलायला तयार नाहीत ही परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. आता कोणी त्यांना विचारत नाही, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.