रत्नागिरी : राज्यातील कृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. या बाबतचे निर्देश उच्च शिक्षण विभागाने राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना दिले आहेत. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे.
त्यानुसार आचारसंहिता नियमाचे पालन करण्याबाबतचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्यातील विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकेतर अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सामायिक परिनियम अस्तित्वात येईपर्यंत महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य होता येणार नाही. त्यांच्याशी संबंध ठेवता येणार नाही किंवा कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा कामात कोणत्याही प्रकारे भाग घेता येणार नाही अथवा सहाय्य करता येणार नाही, असे परिपत्रकात नमूद केले आहे.