रत्नागिरी : शहरालगतच्या राजीवडा येथे गैरसमजातून तरुणाला मारहाण झाल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. तरुणाला मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवाफ नजीर कोतवडेकर, जुमेर वस्ता (दोन्ही रा. राजीवडा जामा मशिदजवळ, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद मोहम्मद जैनुद्दिन वस्ता (४२, राजीवडा, रत्नागिरी) यांनी ६ नोव्हेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद वस्ता हे रस्त्यावर आपल्या पत्नीची वाट पाहत उभे होते. यावेळी शवाफ वैनतवडेकर आपल्या दुचाकीवरुन जुमेर वस्ता याला घेऊ न जात असताना रस्त्यात दुचाकी घसरली. मात्र मोहम्मद वस्ता हे रस्त्यावर उभे असल्यामुळे दुचाकी घसरली असा समज करुन घेत शवाफ आणि जुमेर यांनी शिवीगाळ करुन हाताच्या ठोशाने व दगडाने मारहाण केली. यामध्ये मोहम्मद वस्ता जखमी झाले. त्यांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शवाफ नजीर कोतवडेकर, जुमेर वस्ता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.