राजापूर:-परतीच्या पावसामुळे भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे कृषी विभागातर्फे सर्वेक्षण आणि पंचनामे करण्याचे काम तात्काळ हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार तालुक्यातील सुमारे 23 हेक्टरवरील भातशेती बाधित झाली असून त्यामध्ये 120 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अनिल गावीत यांनी दिली. सर्वेक्षण आणि पंचनाम्याचे काम अद्यापही सुरू असून भातशेतीच्या तालुक्याच्या बाधित क्षेत्रामध्ये अधिक वाढ होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शेतमळयामध्ये आडव्या पडलेल्या भातशेतीला नव्याने फुटवे आले आहेत. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे गुरांसाठी आवश्यक असलेले गवतही सुकविणे मुश्किल झाले आहे. आधीच विविध कारणांमुळे झालेली महागाई आणि परतीच्या पावसासह अन्य कारणांमुळे घटलेले उत्पादन असताना अशा स्थितीमध्ये वर्षभराची धान्याची बेगमी करायची कशी? वर्षभर कुटुंब पोसायचं कस? असा सवाल शेतकऱ्यामधून उपस्थित केला जात आहे.