रत्नागिरी:-जिल्ह्यात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त असलेल्या प्राथमिक शाळांच्या पथ्यावर पडत आहेत. जिल्ह्यात अनेक प्राथमिक शाळा नादुरुस्त असून, निधी नसल्याने त्या मोडकळीस आलेल्या आहेत. पण विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील मतदान केंद्र असलेल्या 156 शाळीं जिल्हा नियोजन आणि सेस फंडातून 1 कोटी 30 लाख 41 हजार मंजूर निधीतून दुरूस्ती केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या 156 प्राथमिक शाळांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. त्यातील बहुतांशी शाळा नादुरुस्त झालेल्या आहेत. ग्रामीण भागात असणाऱ्या काही शाळांच्या भिंतींना तडे गेले आहेत. काही शाळांचे छप्पर मोडकळीस आले आहे. खिडक्या, दरवाजे नादुरुस्त झाले आहेत. अशा शाळांची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. मात्र, पुरेसा निधी नसल्याने ठराविक शाळांचीच दुरुस्ती केली जात होती.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदार केंद्रांवर ग्रामपंचायतीचे अधिनस्त असणाऱ्या या शाळांमध्ये 20 नोव्हेंबरला मतदार प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मतदार केंद्र असल्याने ही मतदार केंद्र सुस्थितीत असणे आवश्यक आहे. याकरिता या मतदान केंद्राची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक आहे. 156 प्राथमिक शाळांमध्ये मतदान केंद्र असल्याने या शाळांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. मतदान केंद्र असलेल्या शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेची धावपळ सुरू झालेली आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन आणि सेस फंडातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या शाळांची दुरुस्तीची कामेही हाती घेण्यात आली आहेत.