गुहागर:-गुहागर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रमोद गांधी व दापोली मतदारसंघाचे उमेदवार संतोष अबगुल यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे गुहागरच्या दौऱ्यावर येत आहेत. पाटपन्हाळे (शृंगारतळी) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानात 8 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता त्यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीत राज्यभरात स्वतंत्र लढत आहे. काही मतदारसंघात भाजपबरोबर त्यांची छुपी युती असल्याचेही बोलले जात आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांना जोरदार मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघ आणि दापोली विधानसभा मतदारसंघ या ठिकाणच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा होणार आहे.
गुहागर मतदार संघ भाजपला न मिळाल्याने येथील पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज असल्याचे आजही बोलले जाते. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांना भाजपचा कडवा विरोध आहे. त्यामुळे येथील भाजपचा फायदा मनसे घेण्याच्या स्थितीत असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी छुप्या पद्धतीने बोलणे झाल्यास गुहागरमध्ये तिसरा पर्याय म्हणून मनसेचे प्रमोद गांधी यांच्या पारडयात मते पडून ते विजयी होतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. गुहागरमध्ये यावेळी मनसेने आपला स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने कार्यकर्त्यांनाही बळ आले असून ग्रामीण भागात जोरदार प्रचार सुरू आहे.
या पत्रकार परिषदेला गुहागर मनसे संपर्कप्रमुख उमेदवार प्रमोद गांधी, जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, उपजिल्हाध्यश विनोद जानवळकर, गुहागर तालुकाप्रमुख सुनील हळदणकर आदी उपस्थित होते.