रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाची जुनी वास्तू पाडून पुनर्बांधणीचे काम नियोजित आहे. त्या पार्श्वभूमीवर वाचनालयाने तथास्तु ही सुरेल सुरांची मैफल व आठवणी यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
वास्तू नवनिर्मित करताना जुन्या वास्तूतील आठवणींना उजाळा द्यावा, वास्तूविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आणि या सर्व भावना रसिक श्रोत्यांच्या साक्षीने व्यक्त व्हाव्यात, नवनिर्मितीसाठी सगळ्यांच्या सकारात्मक भावना सदिच्छा प्राप्त करत जुन्या वास्तूला निरोप द्यावा, हा या आयोजनामागचा भावपूर्ण उद्देश आहे.तथास्तु कार्यक्रम गुरुवारी, दि. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय़ाच्या सभागृहात होणार आहे. रत्नागिरीतील प्रतिथयश लोकप्रिय गायक व वादक सुरेल भावपूर्ण कार्यक्रम घेऊन येत आहेत. प्रसाद गुळवणी, आनंद पाटणकर, राम तांबे, नरेंद्र रानडे, सौ. मुग्धा भट-सामंत, सौ. श्वेता जोगळेकर, अभिजित भट हे कलाकार सेवा म्हणून आपली काही गाणी सादर करणार असून त्यांना हेरंब जोगळेकर, चैतन्य पटवर्धन, प्रथमेश शहाणे, श्रीरंग जोगळेकर, उदय गोखले साथसंगत करणार आहेत.
रसिकांनी वाचनालयाच्या या तथास्तु कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून सुरेल गाणी आणि आठवणींचा आस्वाद घेत वाचनालयाच्या नवनिर्मितीच्या उपक्रमास सदिच्छा द्याव्यात, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.