मुंबई:-निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई नाही तर मुंबई आणि महाराष्ट्राचं जे गुजरातीकरण चाललं आहे ते थांबवण्यासाठी आपल्याला ही निवडणूक जिंकावीच लागेल, अशी साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला घातली.
कोळीवाडे आणि गावठाणं अदानीच्या घशात जाऊ देणार नाही, असे यावेळी त्यांनी ठणकावून सांगितले.
जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी सुरुवात उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थित जनसमुदायाने महाविकास आघाडीचा जयघोष केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, आता निवडणुकांचे फटाके वाजायला लागले आहेत. आपल्याकडे आयटम बॉम्ब आणि पलिकडे तुडतुडे, फुसकुले आणि लवंग्या आहेत. 23 तारखेला महाविकास आघाडीच्या विजयाचे फटाके वाजायलाच पाहिजेत, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी करताच जनसमुदायानेही जोरदार प्रतिसाद दिला.
देवाभाऊंना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सहन होत नाही
मी दसऱयाच्या सभेत सांगितलं होतं की, आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिह्यात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधू. हे मी बोलल्यानंतर देवाभाऊ बोलले. कारण त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सहनच होत नाहीत. कसाबसा पुतळा उभारला तो पण आठ महिन्यांत पडला. शिवाजी महाराज म्हटल्यावर यांच्या अंगाची लाही लाही होते. देवेंद्र फडणवीसांनी मला आव्हान दिलं. तुम्हाला जर शिवरायांचं मंदिर बांधायचं असेल तर पहिलं मंदिर म्हणे मुंब्रा येथे बांधून दाखवा. अहो देवाभाऊ जाऊ तिथे खाऊ, मुंब्रा येथे जा. मुंब्रा येथे प्रवेशद्वारावर जे शिल्प आहे तिथे शिवाजी महाराज आहेत. जिजाऊ आहेत, तुकाराम महाराज आहेत, सावित्रीबाई फुले आहेत. आधी ते जाऊन बघा. मुंब्रा ठाणे जिह्यात येतो. ज्या जिह्यातून तुम्ही आमच्यातला गद्दार फोडलात आणि डोक्यावर बसवला होता. त्याच्या जिह्यात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणं अवघड वाटत असेल तर त्या गद्दाराला डोक्यावर घेतलाच कशाला? वेडीवाकडी आव्हानं आम्हाला देऊ नका. जे तुम्ही बकाल करत आहात त्याला उत्तर म्हणून आम्ही चांगला जाहीरनामा घेऊन आलो आहोत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा समाचार घेतला.
उद्या श्वास घ्यायलाही मोदी सरकार टॅक्स लावेल
महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाकडून जीएसटी व अन्य करांद्वारे सरकार दरवर्षाला 90 हजार रुपये वसूल करते असे राहुल गांधी यांनी सांगितले. हे फारच भयंकर आहे, असे सांगतानाच, उद्या मोदी सरकार श्वास घ्यायलाही टॅक्स लावेल असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. मोदी सरकार लपूनछपून करते, पण आपण करतो ते खुलेआम. जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले. ते म्हणाले की, महिलांच्या योजनेत रकमेची भर टाकणार आहोत असे महाविकास आघाडीने म्हटले होते. त्याचप्रमाणे आजच्या पंचसूत्रीमध्ये महालक्ष्मी योजना जाहीर केली. शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आपण माफ केलेच आहे, आता 3 लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुलींप्रमाणे मुलांनाही आपण मोफत शिक्षण देणार आहोत. पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळेपर्यंत त्यांनी काय करायचे? त्यासाठीच बेरोजगार तरुणांना महाविकास आघाडीचे सरकार दरमहा चार हजार रुपये मदत देणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. विधानसभा निवडणुकीनंतर एक तरूण बेरोजगार होणार आहे, असा टोलाही त्यांनी नामोल्लेख न करत हाणला.
बकवास सरकार आपल्यावर राज्य करतेय
प्रचारानिमित्त अनेक ठिकाणी जाणे झाले तेव्हा काही जण म्हणाले की आता फराळ करायला जमत नाही. कारण महागाई वाढली आहे. महागाई एवढी वाढली आहे की दिवाळीत अनेकांच्या घरांतील फराळामधील पदार्थ कमी झाले आहेत, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या काळात प्रचंड वाढलेल्या महागाईवर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर पाच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती पाच वर्षे स्थिर ठेवण्याचे आपण मंगळवारच्या सभेत जाहीर केले होते. कारण जनता महागाईने त्रस्त झाली आहे आणि मिंधे सरकार देत असलेल्या आनंदाच्या शिध्यामध्ये उंदराच्या लेंडय़ा निघतात. असे हे बकवास सरकार आपल्यावर राज्य करतेय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
धारावीकरांना तिथल्या तिथे घरे देऊ
भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर संविधान बदलणार असा प्रचार इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत केला होता. त्या प्रचाराला भाजपने फेक नरेटिव्ह असे म्हटले होते. पण काहीही झाले तरी आम्हाला संविधान वाचवायचेच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसभेतील प्रचार भाजपवाल्यांना फेक नरेटिव्ह वाटत आहे, मग धारावी प्रकल्पाच्या निमित्ताने निघालेले अनेक जीआर हे फेक नरेटिव्ह नाही होउ शकत का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. अदानींना धारावीसह मुंबईतील अनेक भूखंड दिले गेले. ते सर्व जीआर रद्द करून धारावीकरांना तिथल्या तिथे घरे देऊ, कोरोना काळात धारावी वाचवली होती, आता पुन्हा वाचवू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
कोळीवाडे अदानींच्या घशात जाऊ देणार नाही
मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणांचा पंत्राटदारांसाठी क्लस्टर पध्दतीने विकास करण्याचा घाट मिंधे सरकारने घातला आहे. पण एकही कोळीवाडा पिंवा गावठाण अदानींच्या घशात जाऊ देणार नाही असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. क्लस्टर करून तिथे टॉवर उभारले जाणार मग कोळी बांधव त्यांच्या होडय़ा पार्पिंगमध्ये ठेवणार का, की दुसऱ्या मजल्यावर ठेवणार की तिसऱ्या मजल्यावर. आणि ते मासे कुठे सुकवणार, गच्चीवर सुकवणार का असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. कोळीवाडय़ांचा विकास कोळी बांधवांच्या इच्छेप्रमाणेच करू असेही त्यांनी स्पष्ट केले.