गाव विकास समितीच्या उमेदवार अनघा कांगणे झिरो बजेट इलेक्शन उपक्रमांतर्गत लढाई लढत आहेत
देवरुख:- केवळ पैशाच्या जोरावर मतं विकत घेऊन निवडणुका लढू पाहणारे धनाढय उमेदवार हे गावांच्या विकासासाठी उभे नसून ते गावांची मतं खाण्यासाठी उभे आहेत .त्यांना विकासाशी काही देणंघेणं नाही. निवडून येणं हाच त्यांचा उद्देश आहे मात्र दुसरीकडे गाव विकास समितीच्या उमेदवार अनघा कांगणे या गाव विकास समितीचे विकासाचे व्हिजन घेऊन निवडणुकीच्या रिंगणात आहेत असे स्पष्ट मत गाव विकास समितीचे चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रभारी ऍड.सुनील खंडागळे यांनी व्यक्त केले आहे. निवडणूक काळात ग्रामीण भागात पैशांच्या होणारा अमाप वापर याबद्दल ऍडव्होकेट सुनील खंडागळे यांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा पैशांच्या जोरावर निवडणुका लढल्या गेल्यानेच मागील अनेक वर्ष गावे समस्यांना सामोरे जात असून तरुणांना रोजगार नाहीत.शेती विकास नाही.हॉस्पिटलचा प्रश्न सुटलेला नाही. बंद पडणाऱ्या शाळांबाबत अनेक प्रश्न आहेत असे ऍड. सुनिल खंडागळे म्हणाले .
गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली झिरो बजेट इलेक्शन उपक्रम नुसार गाव विकास समिती निवडणूक लढत असून खऱ्या अर्थाने गावातील सामान्य माणसाच्या हिताचे जे मुद्दे आहेत तेच मुद्दे गाव विकास समितीने या निवडणुकीत घेतले आहेत.मुद्द्यांच्या आधारे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणारी गाव विकास समिती ही एकमेव संघटना आहे. गाव विकास समितीने हॉस्पिटल,शाळांचा दर्जा सुधारणे,शेती विकास पायाभूत सुविधा आणि तरुणांच्या रोजगारासाठी एमआयडीसी विकास असे अतिशय महत्त्वाचे विषय या निवडणुकीत घेतले असून हे प्रश्न सोडवण्याची गॅरंटी दिली आहे. अन्य कोणत्याही पक्षाने या गंभीर विषयांवर नागरिकांना ठोस आश्वासन दिलेले नाही. गाव विकास समिती येथील नागरिकांच्या हक्क अधिकाऱ्यांसाठी लढत असून सर्वसामान्यांचा आवाज गाव विकास समितीच्या माध्यमातून या निवडणुकीत दिसेल असा विश्वास गाव विकास समितीचे चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रभारी ऍड.सुनील खंडागळे यांनी व्यक्त केला. गाव विकास समितीने अनघा कांगणे यांच्या रूपाने महिला उमेदवार चिपळूण संगमेश्वर मध्ये दिला आहे. महिलांचे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सामान्य जनतेने पैशांचा बाजार मांडणाऱ्यांच्या विरोधात जाऊन गाव विकास समितीच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मतदान करावे व गावातील सामान्य माणसाची ताकद दाखवून द्यावी असे आवाहनही ऍड. सुनील खंडागळे यांनी केले आहे.