खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील विद्युतीकरणचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विद्युतीकरणाच्या कामासाठी 50 हून अधिक कर्मचारी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. विद्युतीकरणचे काम प्रगतीपथावर असले तरी बोगद्यापासून काही अंतरावर पूल उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला होण्यास आणखी महिनाभराचा अवधी लागण्याची शक्यता राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील विद्युतीकरणाच्या अपूर्णावस्थेतील कामामुळे वाहतुकीसाठी खुला झालेला बोगदा बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती. गणेशोत्सव कालावधीत बोगद्यात तात्पुरत्या स्वरूपातील वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात आला होता. यामुळे दुसऱ्या बोगद्यातील वाहतूक बंद करावी लागल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. कायमस्वरूपी विद्युतीकरणचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या काही दिवसातच हे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.
विद्युतीकरणचे काम अंतिम टप्प्यात असले तरी बोगद्यापासून काही अंतरावर प्रलंबित राहिलेल्या पुलाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. या ठिकाणी गर्डर बसवण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. पुलाच्या उभारणीनंतरा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाणार आहे. यासाठी डिसेंबर महिना उजाडन्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे कशेडीचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला होण्याची वाहनचालकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.