रत्नागिरी:-तालुक्यातील नाणीज येथे तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर रत्नागिरी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना भाऊबीजेच्या दिवशी रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. चिराग शरद खटकुळ (ऱा नाणीज, रत्नागिरी) व अक्षय सुरेंद्र शिंदे (ऱा सोमेश्वर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
निखिल नारायण सावंत (रा. नाणीज, रत्नागिरी) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली. निखिल सावंत व संशयित आरोपी यांच्यात काही कारणावरुन वाद निर्माण झाला होता. 3 नोव्हेंबर रोजी संशयित आरोपी हे गाडी (एमएच 43 बीके 6210) घेवून निखिल यांच्या घरी गेल़े, तसेच धारदार कुकरी शस्त्राचा धाक दाखवून ‘कोण भाई झाले आहेत, ते मला बघायचे आहे’ अशी धमकी दिल़ी तसेच निखिल याचा चुलत मामे भाऊ याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, असे निखिल याने तक्रारीमध्ये म्हटले आहे. या वादानंतर तक्रारदार व त्यांच्यासोबत गावातील इतर प्रतिष्ठीत व्यक्ती या चिराग खटकूळ याच्या घरी गेल्या. यावेळी चिरागने तक्रारदार यांना मारहाण केली, अशी तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे, मारहाण व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1), 135 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 115,352,351 (2), 3(5) नुसार गुन्हा दाखल केला.