मुंबई:- संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिले. यापुढे मी कोणतीही निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सुपे (ता. बारामती) येथे ते बोलत होते.
मविआचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
पवार म्हणाले, मी आत्ता सत्तेत नाही. परंतु राज्यसभेत आहे. माझी अजून दीड वर्षे शिल्लक आहेत. त्यानंतर राज्यसभेवर जायचे की नाही, याचा विचार मला करावा लागेल. पण मी आता कोणतीही निवडणूक लढवणार नाही. आजवर मी १४ निवडणूका लढवल्या. तुम्ही लोक असे आहात की मला एकदाही घरी पाठवले नाही. प्रत्येक वेळी निवडूनच देत आला. परंतु आता मला कोणतीही निवडणूक नको. सत्ता नको, मात्र समाजकारण करत राहणार आणि लोकांचे काम मी करत राहणार आहे.महाराष्ट्रात नव्या नेतृत्वाची फळी उभा करण्याचा संकल्प आम्ही लोकांनी केले आहे. त्याला तुम्हा लोकांची साथ पाहिजे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे विविध सभांमध्ये समोरून तुम्हाला भावनिक केले जाईल असे सांगत आहेत. शरद पवार यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. पवार म्हणाले, काही लोक सांगतात मी भावनिक होईल. भावना वगैरे काही नसतात. लोकांच्या मनात जे आहे त्यालाच लोक निवडून देतात. दुसरे काही कारण नाही, कोणालाही भावनिक करण्याची काही गरज नाही. मला आता आमदारकी नको. खासदारकी नको. आता इथल्या लोकांची राहिलेली कामे मार्गी लावणे एवढेच माझे काम असल्याचे ते म्हणाले.