सिंधुदूर्ग:-संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सावंतवाडी मतदारसंघात अखेर महायुती व महाविकास आघाडी मध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांनी निवडणुकीतून माघार घेतली नाही.
त्यांचे बंड क्षमविण्यास भाजपाला यश आले नाही. त्याचप्रमाणे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार सौ. अर्चना घारे परब यांनी बंडाचा झेंडा खाली न ठेवता आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आता चौरंगी लढत होणार आहे. त्यामुळे एकतर्फी होईल अशी वाटत असलेली हि निवडणूक आता रंगतदार व चुरशीची होणार आहे.
विशाल परब हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यामुळे या मतदारसंघातून तीन वेळा विजय झालेले आमदार दीपक केसरकर यांना मोठे आव्हान निर्माण झाले आहे. तर भाजपच्या मतांवर डोळा ठेवून असलेले उबाठा शिवसेनेचे उमेदवार राजन तेली यांची ही डोकेदुखी यामुळे वाढणार आहे. गेल्या दोन-चार वर्षात खेडोपाडी विशेषतः महिलांमध्ये आपल्या संपर्क वाढविलेल्या सौ. अर्चना घारे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे त्याचा फटका कोणाला बसू शकतो हे आता 23 तारखेला समजणार आहे. त्यामुळे दीपक केसरकर चौथ्यांदा विजय होतात की राजन तेली सावंतवाडी मतदारसंघात आपले खाते उघडतात याची उत्सुकता सर्व जनतेला लागली आहे. त्याचबरोबर सावंतवाडी मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुनील पेडणेकर व दत्ताराम गावकर यांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत.