कणकवली:-कणकवली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अपक्ष उमेदवार प्रकाश नारकर आणि विश्वनाथ कदम या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज आज मागे घेतले.
तसेच या दोहोंनीही महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश नारकर व विश्वनाथ कदम म्हणाले, कणकवली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून विकास होणार असून संदेश पारकर हे आमचे मित्र आहेत. मतविभागणी होऊ नये म्हणून आम्ही माघार घेत असून संदेश पारकर यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर म्हणाले, प्रकाश नारकर व विश्वनाथ कदम यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा अशी विनंती आम्ही त्यांना केली होती. आमच्या विनंतीला मान देऊन आणि राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते यांच्यावर विश्वास ठेवून संदेश पारकर यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे सांगितले.