राजापूर:-काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी त्यांनी माघार घेतलेली नाही.
काँग्रेसचे सदस्य म्हणून त्यांनी दाखल केलेला अर्ज आधीच बाद झाला आहे. अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने राजापूरमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे.
राजापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी आग्रही मागणी अविनाश लाड यांनी केली होती; मात्र महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ ठाकरे गट शिवसेनेला सोडून विद्यमान आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अविनाश लाड यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी लाड आघाडीचा धर्म पाळणार की बंडखोरी करणार याबाबत उत्सुकता होती. मात्र सकाळपासूनच लाड अज्ञातवासात होते. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महाविकास आघाडीत बंडखोरी झाली असून याचा फटका राजन साळवी यांना बसू शकतो, असे मानले जाते. या मतदारसंघातून विद्यमान आमदार राजन साळवी यांच्यासह शिंदे शिवसेनेकडून किरण सामंत रिंगणात आहेत.