मुंबई:-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर आता मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
पुढील पोलीस महासंचालक निवडीसाठी मुख्य सचिवांना मंगळवार (5 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. दरम्यान तीन आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निर्धारित वेळेत आयोगाकडे पाठवावी लागतील.
विवेक फणसाळकर हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकात अतिरिक्त महासंचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली आहे. त्यापाठोपाठ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखपदीही ते होते. कडक शिस्त आणि प्रामाणिकपणा या त्यांच्या गुणांमुळे ते खात्यात ओळखले जातात.
दरम्यान पुढील पोलीस महासंचालक निवडीसाठी संजय वर्मा (पोलीस महासंचालक, कायदा आणि तंत्रज्ञान), रितेश कुमार (पोलीस महासंचालक, होमगार्ड) आणि संजीव कुमार सिंघल (पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) या महाराष्ट्र केडरमधील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांची शिफासर केंद्रीय निवडणूक आयोगाला केली जाण्याची शक्यता आहे.