राजापूर:-ऐन दिवाळी सणात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. राजापूर तालुक्यात मागील दोन दिवस वादळी वाऱयासह जोरदार पाऊस कोसळला या पावसात चुनाकोळवण गावातील दोन घरांवरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. तर वादळी पावसात तालुक्यात अनेक गावांमध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत असल्याने ग्रामस्थांना अंधारात दिवाळी साजरी करावी लागत आहे.
नवरात्रोत्सवापासून तालुक्यात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे भातशेतीसह मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात तीन ठिकाणी वीज पडून ग्रामस्थांना दुखापत झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दिवाळीपूर्वी काही दिवस परतीच्या पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र दिवाळी सणाला सुरूवात होताच पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने दिवाळीच्या आनंदावर वीरजण पडले आहे. मागील दोन-तीन दिवस वादळी वारे आणि वीजंच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. यामध्ये चुनाकोळवण गावातील अनिरूध्द जाधव यांच्या घराचे पत्रे उडाले आहेत. तर मोहन जाधव यांच्या पडवीवरील पत्रे उडाल्याने दोघांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान यावर्षी नवरात्रोत्सवापासून परतीच्या पावसाने जोर धरल्याने भात कापणीची कामे रखडली होती. कापणीयोग्य झालेले भात वादळी वाऱयामुळे आडवे पडल्याने व त्यातच पाऊस सुरू असल्याने पडलेल्या भाताच्या लोंब्याना पुन्हा कोंब फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील काही दिवस पावसाने उसंत घेतल्याने भात कापणी आणि झोडणीच्या कामांनी वेग घेतला होता. मात्र आता पुन्हा परतीचा पाऊस कोसळू लागल्याने शेतकऱयांचे मोठे नुकसान होत आहे.