पटखेळाचे सुमारे 1400 वर्षापूर्वीचे चिन्ह प्रथमच रत्नदुर्ग किल्ल्यावर
रत्नागिरी:-रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी येथे आफ्रिका मधील पारंपारिक पटखेळातील प्रकार ‘मंकाळा’ खेळाचे कातळचिन्ह आढळून आले आहे. ज्यावेळी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्यावतीने नुकतेच रत्नदुर्ग किल्ल्याची साफसफाई करण्यात आली, त्यावेळी दीपगृह परिसरात हे शिल्प या प्रतिष्ठानामध्ये कार्यरत असणाऱ्या संशोधन अभ्यासक स्नेहल बने यांच्या ही बाब लक्षात आली. हे पटखेळाचे चिन्ह सुमारे 1400 वर्षापूर्वीचे असून प्रथमच असे रत्नदुर्ग विभागात दिसून आले आहे, असा दावा बने यांनी केला आहे.
‘मंकाळा’ हा आफ्रिकन लोकांमध्ये खेळला जाणारा पटखेळ आहे कातळावर गोल आकाराचे खड्डे एका रांगेत हव्या असलेल्या पटांची संख्येमध्ये कोरून दोन सवंगडी मध्ये हा खेळ खेळला जातो, भारतात अनेक ठिकाणी याला गायचारा, पलंगुळी, अलीगुळी आदी नावाने ओळखले जाते. तसेच खेळ सापडलेल्या ठिकाणी शिवपिंडी सारख्या आकाराचे देखील दोन शिल्प असल्याचे दिसून येत आहे. गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या कार्यामध्ये रत्नदुर्ग किल्ल्याचे बालेदार तन्मय जाधव व सक्षम शिंदे यांची देखील मोलाची मदत झाली असे स्नेहल बने यांनी सांगितले.
रत्नदुर्ग किल्ला परिसरातील आढळून आलेले मंकाळा पटखेळ 1 फूट 9 इंच लांब असून त्यावर 12 पट आहेत तर शिवपिंडी 1 फुट लांब व 8 इंच रुंद आहेत तसेच याठिकाणी एक पुर्ण वर्तुळ असून दुसऱ्या वर्तुळाच्या मध्यभागी रेषा असलेली तीन चिन्ह एकाच कातळावर कोरलेली दिसतात ‘मंकाळा’ पटखेळाची चिन्हे आढळून आल्याने यातून त्याकाळी आफ्रिकन प्रजातीचे लोक भारतात व्यापार व प्रवासी मार्गाने आली होती.
पुरातत्वशास्त्रज्ञांच्या व संशोधकांच्या मते हे अवशेष 7 व्या शतकातील असल्याचा दावा केला जात आह़े. स्नेहल बने यांनी सांगितले की, अशा प्रकारचे प्राचीन कातळशिल्पांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. विकास करताना अशा ऐतिहासिक ठेवा असलेल्या गोष्टींना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. रत्नदुर्ग किल्ला येथे नव्याने शिवसृष्टी उभारली जात आहे मात्र त्याचा अधिक विस्तार झाल्यास ऐतिहासिक गोष्टी नष्ट होण्याची भिती आहे शिवसृष्टीच्या निमित्ताने मोठया संख्येने पर्यटक रत्नदुर्ग किल्ला येथे येतात त्या लोकांपर्यंत कातळशिल्प व त्याचे ऐतिहासिक महत्व पटवून दिल्यास लोकांची पावले याठिकाणी वळण्यास मदत होईल कोकणात मोठया संख्येने कातळशिल्प आढळून येत आहेत. मुबई-पुण्यातून येणारा पर्यटक हा थेट गोव्याकडे वळतो. कातळशिल्पाचे योग्य पद्धतीने संवर्धन झाल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येईल व हे पर्यटक कोकणात व पर्यायाने रत्नागिरीत दाखल होतील असे बने यांनी यावेळी सांगितल़े.