मुंबई:- राज ठाकरे यांनी डोंबिवलीत सभा घेतली. या सभेदरम्यान त्यांनी शिवसेना चिन्ह, महायुती आणि महाविकास आघाडी, विधानसभा निवडणूक अशा अनेक मुद्द्यावर भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली.
त्यांनी या पक्षांचे चिन्ह आणि नाव घेतले. यावर राज ठाकरेंनी भाष्य केले आहे. ते यावेळी आक्रमक होत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची नाही तर शिवसेना, धनुष्यबाण ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. असं म्हणत त्यांनी या दोघांवरही टीका केली आहे.
राज ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. राजू पाटील यांच्या मतदारसंघातून मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटला आहे. याठिकाणी सभा घेत राज ठाकरेंनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना टारगेट केलं होतं. २०१९ चा सकाळच्या शपथविधीवर त्यांनी गमतीशीर भाष्य केले आहे. त्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला आहे.
ते म्हणाले की, याआधी २०१९ मध्ये निवडणुका झाल्या होत्या. निवडणुका संपल्यावर निकाल लागला. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. सकाळचा शपथविधीही झाला. पण नंतर काकांनी डोळे वटारल्याने पंधरा मिनिटातच ते लग्न तुटलं. मग नंतर ते घरी जाऊन म्हणाले, काका मला माफ करा. त्यानंतर ज्यांच्याविरोधात लढले. त्यांच्यासोबत युती केली. उद्धव ठाकरेंही ज्यांविरोधात लढले नंतर त्यांच्याशी मैत्री केली, राज ठाकरेंनी असं म्हणत उद्धव ठाकरे आणि अजित पवारांवर टीका केली आहे.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नाव आणि निशाणी घेतली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि निशाणी घेतली. मात्र मी सांगू इच्छितो, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची प्रॉपर्टी नसून ती बाळासाहेबांची आहे. तुम्हाला काय राजकारण करायचं असेल ते करा. कोणते आमदार फोडायचे असतील ते फोडा. पण याला कसं हात लावता? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.