राजापूर/राजन लाड:-‘कमांडर’ या दिवाळी अंकाचा यंदाचा ‘रंगकर्मी विशेषांक (नाटक, नाटक आणि नाटक)’ हा अतिशय दर्जेदार दिवाळी अंक असून तो संग्रहणीय असाच आहे!”, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष, तथा अ. भा.नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य, सुप्रसिद्ध नाट्य सिने निर्माते मेघराज राजेभोसले यांनी केलं.
या दिवाळी अंकाचं प्रकाशन नुकतेच पुणे येथे एका छोटेखानी समारंभात श्री. राजेभोसले यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास अंकाचे संपादक डॉ. राजू पाटोदकर, ज्येष्ठ पत्रकार तथा ज्येष्ठ नाट्य समीक्षक- नाटककार राज काझी, ‘कमांडर’चे लेखक तथा हितचिंतक ज्येष्ठ रंगकर्मी रविंद्र देवधर, समाजसेवक परळीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
“अंकाचं २८ वर्षांचं सातत्य आणि नाटक विषयक सर्वांगीण बहुमोल अशी माहिती हे देखील आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे”, असेही श्री. राजेभोसले यावेळी म्हणाले.
“महाराष्ट्रात नाट्यक्षेत्राची आवड असलेला, नाटक पाहणारा आणि नाटक वाचणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्यासाठी कमांडर हा दिवाळी अंक जणू मेजवानीच आहे. दरवर्षी विविध विषयांवरील भरपूर वाचनीय मजकूर यात असतो. मी सुद्धा कमांडरच्या विशेषांकाचा चाहता आहे. या राज्यस्तरीय अंकास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा”, असे मनोगत नाट्य समीक्षक, नाटककार राज काझी यांनी यावेळी व्यक्त केले.
“गेल्या २८ वर्षांपासून संपादक डॉ. राजू पाटोदकर व प्रा. डॉ. संजय पाटील – देवळाणकर यांच्या मार्गदर्शनात ‘कमांडर’ तयार होत आहे. दर वर्षी एखादा विशिष्ट विषय घेऊन त्यावर संपूर्ण अंक प्रकाशित करणं हे ‘कमांडर’चं खास वैशिष्ट्य. त्यानुसार या वर्षी एक नवीन प्रयोग म्हणून जुन्या-नव्या नाटकांची रोचक माहिती देऊन अंक सजवण्यात आलाय, ज्यामुळे निश्चितपणे वाचकांचे मनोरंजन होईलच, पण त्याबरोबरच पूर्वी पाहिलेल्या आणि आवडलेल्या नाटकांच्या स्मृती पुन्हा एकदा ताज्या होतील”, असं मत ‘कमांडर’चे लेखक रवींद्र देवधर यांनी व्यक्त केले.
यात विविध लेख आहेत. यात प्रामुख्याने डॉ. वि. ल. धारुरकर (नटसम्राट), श्रीनिवास नार्वेकर (रायगडाला जेव्हा जाग येते), दिलीप ठाकूर (नाटकांवर आधारित चित्रपट),संजय डहाळे (सही रे सही ), राजीव जोशी (पुरुष – गुजराती रंगभूमी), सुवर्णा बेडेकर (ती फुलराणी), श्रीनिवास बेलसरे (डॉक्टर तुम्ही सुद्धा), मीना नाईक (वाटेवरती काचा गं ), दीपक सातपुते (सविता दामोदर परांजपे), रणजीत मसुरेकर (फक्त एकदाच) शरद कोरडे( तो मी नव्हेच ), रविंद्र देवधर (वस्त्रहरण – कुर्यात सदा टिंगलम – नातीगोती), सना पंडित (आरण्यक – हमीदाबाईची कोठी), अपर्णा कुलकर्णी (आई रिटायर होतेय),राम खेडकर( थँक्यू मिस्टर ग्लाड ), अजितेम जोशी(नाथ हा माझा ), सुधीर सेवेकर (बॅरिस्टर), प्रकाश राणे (मंच ते मंचक ते मंच), श्रीकांत कुलकर्णी (ऑल द बेस्ट), मल्हार दामले (मोरूची मावशी), धनंजय कुलकर्णी (बालगंधर्व), मिलिंद कल्याणकर (गेला माधव कुणीकडे), शोभना मयेकर (लाली लिला ), श्रीकांत सराफ (पार्टी), रमेश धनावडे (नाट्य अवलोकन), शिरीष कुलकर्णी (रंगभूमी व्यवस्थापन), समीर दळवी (नाट्य विषयक नियतकालिकं),डॉ संपदा कुलकर्णी (महानिर्वाण ), देवेंद्र प्रभुणे (घाशीराम कोतवाल व पाश्चात्त रंगभूमी), डॉ. राजू पाटोदकर (समृद्ध रंगभूमी – आमदार सौभाग्यवती), तसेच गिरीश दीक्षित (विच्छा माझी पुरी करा) या मान्यवरांचे लेख आहेत.
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरे तसेच गोवा पणजी येथेही हे अंक उपलब्ध आहेत.