खेड/सुदर्शन जाधव:-माकडांचा उपद्रव साऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला होता. माकडांपासून होणारा त्रास कमी करण्यासाठी वनविभागाने पिंजरे खरेदी केले आहेत. तालुक्यात आंबा बागायतदारांसह शेतकऱ्यांना माकडांपासून होणारा त्रास कमी करण्यासाठी असल्याने वनविभागाकडून माकडे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
वनविभागाने १६ ते २१ ऑक्टोबर दरम्यान ३२ माकडे पकडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
तालुक्यात हिवाळ्यात भातशेती कापणी योग्य झालेली असतानाच माकडांच्या धुडगूस घातल्याने शेतीची नासाडी होते. आंबा, काजूसह फळबागांना देखील माकडांच्या उपद्रवाचा फटका बसतो. यामुळे आंबा बागायतदारांसह शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते या पार्श्वभूमीवर संभाजीनगर येथून प्रशिक्षितांना बोलावण्यात आले असून त्यांच्यामार्फत मोहीम राबवण्यात येत आहे.
वनविभागाने ३२ माकडे पिंजऱ्यात ‘जेरबंद करत त्यांना सह्याद्रीच्या जंगलमय भागात मुक्त केले आहे. माकडांचा त्रास कमी झाल्याने शेतकऱ्यांसह आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.