दापोली:-मध्यरात्री फटाके लावू नका सांगितल्याच्या रागातून वृद्धला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दापोली तालुक्यातील हर्णै भवानी चौक येथे फटाके लावण्यावरून हा वाद झाला होता. या वादातून आता परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विकी राजेंद्र धाडवे (25, रा. हर्णै राजवाडा) व ऋतिक राजन पवार (रा. हर्णै भाटवाडी) हे 30 ऑक्टोबर रोजी रात्री 2.30 च्या दरम्यान हर्णे भवानी चौक येथे दीपावली सणानिमित्त सार्वजनिक कंदील लावण्याचे काम करत होते. तेव्हा ते फटाकेही फोडत होते. त्या वेळेला जहुर करीम सुर्वे व ओसामा जहूर सुर्वे (दोघेही रा. हर्णै) हे हर्णै बसस्थानकाच्या बाजूने मोटारसायकलवरून त्या ठिकाणी आले. त्यांनी गाडी थांबवून विकी धाडवे व ऋतिक पवार यांना फटाके फोडण्याची ही जागा आहे का, अशी विचारणा केली. दिवाळी असल्याने फटाके फोडत असल्याचे धाडवे यांनी सांगितले.
त्याचा राग येऊन जहूर सुर्वे यांनी हातातील कप व थर्मास असलेली पिशवी धाडवे याच्या डोक्यात मारून दुखापत केली. तसेच सोबत असणारा ऋतिक पवार याला देखील थर्मासने मारून डोक्याला दुखापत केली. तसेच त्या दोघांनी मिळून धाडवे व पवार यांना हाताच्या थापटाने मारून शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिल्याचे धाडवे यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीनुसार जहुर सुर्वे व ओसामा सुर्वे यांच्यावर दापोली पोलीस स्थानकात बी एनएस कलम 118 (1) 351 (2) 352 , 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक डी. डी. पवार करीत आहेत.