चिपळूण:-एव्हिएशन संदर्भात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित नोकरी दिली जाईल असे आमिष दाखवून शहरातील एका ऍकॅडमी संचालकाने तब्बल 2 लाख 43 हजार 500 रुपयाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ऍकॅडमी संचालकावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिध्दांत पालकर याच्यासह ओंकार जैसवाल व राज कदम याने शहरातील परकार कॉम्फ्लेक्स येथे व्हिजन एव्हिएशन ऍकॅडमी मध्ये 15 जून 2023 ते 26 ऑगस्ट 2024 या कालावधीत एव्हिएशन संदर्भात प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एव्हिएशन विषयी संबंधि नोकरी मिळवून दिली जाईल असे आमिष प्रशांत पवार याने त्याला दाखवले हेते. प्रशिक्षण करताना पवार याने विविध कारणासाठी पैशांची मागणी करुन पैसे घेतले. मात्र प्रत्यक्ष भारताबाहेर थायलंड व लाओस याठिकाणी सिध्दांत याला पाठवून एव्हिएशन कोर्सशी संबंधित नोकरी न देता अन्य प्रकारची कामे करण्यास भाग पाडले. यात त्याचे त्याची 2 लाख 43 हजार 500 रुपये रक्कमेची आर्थिक फसवणूक झाली. हा प्रकार सिध्दांत याच्या लक्षात आल्यानंतर याप्रकरणी त्याने दिलेल्या फिर्यादानुसार गुरुवारी ऍकॅडमी संचालक पवार याच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.