खेड:-खेड-दापोली मार्गावरील कुवे घाटात शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजता सुमारास दापोली-मिरज एसटीला झालेल्या अपघातात चालक संजय अण्णासो जाधव, वाहक बी. डी. माळी जखमी झाले. ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडल्याचे समजते.
दापोली आगारातील बस (एम.एच. 14 बीटी 3690) घेऊन चालक संजय जाधव प्रवाशांना घेऊन दापोली येथून मिरजच्या दिशेने जात होते. कुवे घाटाजवळ बसमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना खाली उतरवून अन्य बसमधून व्यवस्था करण्यात आली होती. यानंतर बस सुरू झाल्यानंतर मार्गस्थ होत असतानाच अचानक ब्रेक रिकामी झाल्याने बस लगतच्या शेतातच घुसली. अपघाताचे वृत्त कळताच सामाजिक कार्यकर्ते सुरेश हंबीर तातडीने घटनास्थळी पोहोचले.
चालक-वाहकांना उपचारासाठी फुरुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात एसटीचे नुकसान झाले. अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक पोलीसही घटनास्थळी पोहोचले. अपघाताबाबतचा अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.