मुंबई : मुलगा असू द्या, किंवा मुलगी.. आई-बाबा होणं जगातील कोणत्याही स्त्री-पुरुषासाठी मोठं सुख असतं. खरं तर गर्भाशयातील मुलाचे लिंग हे पालकांच्या गुणसूत्रांवर अवलंबून असते. पण अलीकडच्या संशोधनात धक्कादायक गोष्टी आढळल्या आहेत. आजकाल तरुणांंमधील Y गुणसूत्रे हळूहळू कमी होत असल्याचे समोर आले आहे. हे असेच चालू राहिले तर भविष्यात फक्त मुलीच जन्माला येतील आणि पुरुषांचा जन्म शक्य होणार नसल्याचे सांगण्यात येतंय. नेमकं काय म्हटलंय या संशोधनात?
मानवामधील Y गुणसूत्रे हळूहळू कमी होतंय?
खरं तर स्त्रियांमध्ये दोन X गुणसूत्र असतात, तर पुरुषांमध्ये एक X आणि एक Y गुणसूत्र असते. जर गर्भामध्ये XX गुणसूत्र असतील तर ती मुलगी आहे आणि जर XY असेल तर तो मुलगा आहे. मुलाच्या जन्मासाठी Y गुणसूत्र आवश्यक आहे. पण अलीकडच्या संशोधनात Y गुणसूत्रे हळूहळू कमी होत असल्याचे समोर आले आहे. हे असेच चालू राहिले तर भविष्यात फक्त मुलीच जन्माला येतील आणि पुरुषांचा जन्म शक्य होणार नाही. Y गुणसूत्र नाहीसे व्हायला लाखो वर्षे लागतील, तरी संपूर्ण मानवजातीसाठी ही धोक्याची घंटा आहे. शास्त्रज्ञ यावर व्यापक संशोधन करत आहेत, जेणेकरून Y गुणसूत्र नष्ट होण्यापूर्वी त्यावर उपाय शोधता येईल.
Y गुणसूत्र: मानवी भविष्यासाठी धोका?
सायन्स अलर्टच्या अहवालानुसार पुरुषांचे Y गुणसूत्र हळूहळू नाहीसे होत आहे. Y क्रोमोसोम म्हणजेच गुणसूत्र हळूहळू नष्ट झाल्याने मानवी भविष्यासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. ते संपण्यास लाखो वर्षे लागू शकतात. Y गुणसूत्र नाहीसे होण्यापूर्वी मानवाने नवीन जनुक विकसित केले नाही, तर पृथ्वीवरील मानवाचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते.