रत्नागिरी:-हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्ये पावसाळी हंगामासाठी 73 हजार 777 शेतकऱ्यानी विविध पिकांसाठी सहभाग नोंदवला होता. प्रत्यक्षात जागेवर फळबाग नसताना नोंदणी केली गेल्याच्या तक्रारी कृषी खात्याकडे आल्यानंतर नमुना पाहणी करण्यात आली तेव्हा 59 टक्के अर्ज बनावट असल्याचे आढळले. आता राज्यात सगळीकडे फळपीक विमा योजना क्षेत्र पडताळणीचे आदेश जारी झाले आहेत.
फळपीक विमा योजनेसाठी नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यानी प्रत्यक्षातील फळबागेपेक्षा अधिक क्षेत्राची नोंदणी केली गेल्याच्या तक्रारी कृषी आयुक्तालयाला प्राप्त झाल्य़ा. त्यामुळे आयुक्तालयाने 10 तपासणी पथके तयार केली आणि 363 फळबागांची पडताळणी केली. या पडताळणीत 59 टक्के अर्ज बनावट असल्याचे लक्षात आल़े. बनावट अर्जदारांना लगोलग या योजनेतून वगळण्यात आले. आयुक्तालयाच्या पथकाने 5 जिल्ह्यात 365 बागांना भेट दिली. त्यातील 148 बागा विमायोग्य आढळल्य़ा. 136 ठिकाणी लागवडच आढळली नाह़ी. 55 ठिकाणी नमूद क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्राचा विमा उतरवला गेल्याचे आढळले. 5 ठिकाणी एकाच क्षेत्रावर एकापेक्षा अधिक व्यक्तींनी फळपीक विम्यासाठी नोंदणी केल्याचे लक्षात आले, अशी माहिती कृषी खात्याच्या नियोजन विभागाचे संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व कृषी विभागांनी क्षेत्र पडताळणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात आले तर शेतकऱ्याला 5 वर्षासाठी विमा योजनेसाठी अपात्र ठरवण्यात येईल़, अशी माहिती कृषी खात्याच्या नियोजन विभागाचे संचालक आवटे यांनी दिली.